सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथे अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरीपुत्राने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गुणवंत अजाब कुमरे (वय 43) असे मृत शेतकरीपुत्राचे नाव असून, त्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाचा कोप आणि शेतीतील अपयश यामुळे गुणवंत यांच्यावर कर्जाचे ओझे वाढत होते. यावर्षीच्या अतिवृष्टीने त्यांचे पिक पूर्णपणे नष्ट झाले, त्यामुळे तीव्र मानसिक तणावाखाली त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा आहे.
घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास तो शेताकडे निघाला होता. काही वेळानंतर तो रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला. तातडीने त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. गुणवंत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कृषी धोरणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटना थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Tags
यवतमाळ