सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षा आणि 15 मार्च 2024 च्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थान मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी भूषविले.
संघटनेने स्पष्ट केले की शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले असून, टीईटी संदर्भात शिक्षकांच्या बाजूने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटनांनी पुन्हा एकत्र येऊन “आता नाही तर कधीच नाही” या घोषवाक्याखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. या मोर्चामध्ये 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करणे, शिक्षण सेवक पद कायमचे रद्द करणे आणि वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू दिनांकापासून ग्राह्य धरण्याच्या मागण्या मांडल्या जाणार आहेत.
या आंदोलनाच्या तयारीसाठी 1 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, 2 ते 7 नोव्हेंबर दरम्यान खासदार, आमदार आणि मंत्री यांना निवेदने सादर करण्यात येणार आहेत. तसेच 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सर्व शाळांमधून जनजागृती मोहीम राबवून शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाईल. शासनाने शिक्षकांच्या मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
