अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मागणी; स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे निवेदन

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी

वणी : वणी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच औद्योगिक कंपन्या व कोळसा खाणींमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना व युवासेना यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वणी शहर व परिसरात सुगंधित तंबाखू विक्री, गांजा व ड्रग्स विक्री, सट्टापट्टी व्यवसाय तसेच अवैध रेती तस्करी हे समाजविघातक धंदे बिनधास्तपणे सुरू असून त्यांचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून युवक व विद्यार्थी वर्ग चुकीच्या मार्गावर जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

विशेषतः सुगंधित तंबाखूच्या वाढत्या सेवनामुळे तोंडाचा, जीभेचा व अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. त्यामुळे या सर्व अवैध व्यवसायांवर तात्काळ छापेमारी करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच वणी परिसरातील औद्योगिक कंपन्या व कोळसा खाणींमध्ये स्थानिक युवकांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी स्थानिक बेरोजगार युवक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहत असून सामाजिक असंतोष वाढत आहे. स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यासाठी स्पष्ट धोरण आखून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही शिवसेना व युवासेना यांच्या वतीने संबंधित विभागांकडे अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याबाबत स्पष्ट आदेश निर्गमित करावेत, अशी ठाम मागणी शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post