सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
वणी : शहरातील सराफा व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवित 4 ते 5 दरोडेखोरांनी लुटले होते. या घटनेत 12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. खळबजनक घटना 29 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजता घडली होती. या प्रकरणात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने अखेर गुन्ह्याचा उलगडा केला. तांत्रिक तपासाच्या आधारे दरोडेखोरांची टोळीच जेरबंद केली आहे. आरोपींकडून 13 लाख 22 हजार 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका नागपूर येथील महिलेशी संगणमत करीत आरोपीने कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सागर बजरंग धोंगडे, वय 34 वर्ष, रा. गोधणी कोठा मुलकी, श्रीमती, वैशाली संजय वाघमारे वय 45 वर्ष, रा. न्यु नरसाळा नागपुर, ऋतीक लीलाधर गेडाम, वय 21 वर्ष, रा. भाजी मंडी जवळ विठ्ठलवाडी यवतमाळ अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या घटनेतील अन्य ४ आरोपींचा शोध घेवून त्या देखील ताब्यात घेण्याची कारवाई सुरु आहे.
वणी शहरातील सराफा व्यापारी संजय निळकंठ कोंडावार रा. संतगाडगे बाबा चौक वणी यांच्या राहते घरी दिनांक 29 नोवहेंबर रोजी रात्री अंदाजे 2 वाजताच्या दरम्यान 4 अज्ञात आरोपीतांनी सेक्युरीटी गार्ड व व्यापारी संजय कोंडावार यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांना मारहाण करीत सोन्याचे दागिने व नगदी रक्कम असा एकुण 12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस स्टेशन वणी येथे आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदरचा गुन्हा उघडकीस आणन्याच्या सुचना दिल्या होत्या. स्था.गु.शा. पथक यवतमाळ यांना माहिती मिळाली की, गोधनी कोठा मुलकी येथील सागर धोंगडे याचा व त्याचे इतर साथीदार यांचा सदर गुन्ह्यात सहभागी आहे. त्यावरून उमरसरा परिसरातील एका शिवभोजन केंद्रातून आरोपी सागरला पोलिसांनी अलगद ताब्यात घेतले व त्याची कौशल्यपूर्वक कसुन चौकशी केली असता त्याने वैशाली वाघमारे नागपुर हिचे मदतीने कट रचुन अन्य पाच साथीदारांसह मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली.
