मंदिरांच्या भूमी संरक्षणासाठी 'अँटी लैंड ग्रॅबिंग अॅक्ट' लागू करा

मंदिर विश्वस्तांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

 

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी


वणी : वणी महाराष्ट्र मंदिर महासंघासह वणी येथील विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांच्या कोट्यवधींच्या जमिनी भूमाफियांपासून वाचवण्यासाठी 'अँटी लैंड ग्रॅबिंग अॅक्ट' तात्काळ लागू करण्यात यावी, अशी मागणी वणी येथील विविध मंदिरांच्या विश्वस्थांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्रातील हजारो एकर 'देवस्थान इनाम' जमिनी भूमाफियांनी हडपल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीतील ६७१ गटांवर थेट अतिक्रमण झाले आहे. महाराष्ट्रात जमीन हडपणे हा फौजदारी गुन्हा मानणारा सक्षम कायदा नसल्याने, भूमाफियांचे फावले आहे. त्यामुळे भूमाफियांवर वचक बसवण्यासाठी गुजरात, कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'अँटी लैंड ग्रॅबिंग अॅक्ट' हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचा फौजदारी कायदा तातडीने लागू करावा. या कायद्यांतर्गत विशेष तपास पथके स्थापन करून मागील २० ते २५ वर्षांतील देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणांची सखोल चौकशी करावी. या खटल्यांसाठी प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ते सहा महिन्यांत निकाली काढण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. 

निवेदन देतांना श्री रंगनाथ स्वामी मंदिराचे सचिव विलास पारखी, श्री जटाशंकर मंदिर,जोडमहादेव मंदिर समितीचे जयंत लिडबिडे, श्री नृसिंह देवस्थान समितीचे सचिव माधव केदार, श्री हनुमान मंदिर यात्रा मैदान समितीचे शुभम मदान, श्री विठ्ठल रुक्मिनी देवस्थान समितीचे सुरेश बन्सोड, श्रीराम मंदिर देवस्थान समितीचे अनुराग काठेड, यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ कल्याण पांडे, प्रेम ठाकरे, वेदांत पिदुरकर, अर्जून वैद्य, अजय बजाईत, धिरज मार्कंडे, मनिष ठाकुर, अजय पांडे, पवन बुरहान, लहू खामनकर, आणि महासंघाचे लोभेश्वर टोंगे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post